रेती बंदरमधील अवैध मॅरेज हॉलवर ६ महिन्यांनंतरही कारवाई नाही?”
आरटीआयमध्ये अवैध ठरलेले हॉल, तरीही शांत प्रशासन – मुंब्रामध्ये संताप
मुंब्रा: रेती बंदर परिसरातील अनेक मॅरेज हॉल्सना मुंब्रा प्रभाग समितीने स्वतः माहिती अधिकार (आरटीआय) अंतर्गत दिलेल्या उत्तरात अवैध असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तरीदेखील, गेल्या सहा महिन्यांपासून नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत असूनही या बेकायदेशीर बांधकामांवर अद्याप कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा संबंधित मॅरेज हॉल्सना अधिकृतरीत्या अवैध घोषित करण्यात आले आहे, तेव्हा कारवाईस इतका विलंब का होत आहे? कायद्याचे समान पालन सर्वत्र होणे अपेक्षित असताना रेती बंदर परिसरातील या प्रकरणाकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त विजय कावले यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, नेमक्या कोणत्या दबावाखाली किंवा प्रभावाखाली या अवैध बांधकामांवर कारवाई टाळली जात आहे? या संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता राखून तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेत, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. आता पुढील काळात प्रशासन या प्रकरणात ठोस पावले उचलते का, की ही बाब केवळ आश्वासनांपुरतीच मर्यादित राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
